एक थोर समाजसुधारक (जोतीराव गोविंदराव फुले)

जोतीराव गोविंदराव फुले

भारतीय समाजसुधारक


जोतीराव गोविंदराव फुले (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), इतर नावे: महात्मा फुलेज्योतिबा फुले, हे समाजसुधारक, विचारवंत आणि मराठी लेखक होते. त्यांनी सत्यशोधक समाज हि संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, बहुजन व अस्पृश्य समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.

'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.

जोतिबांना अपत्ये नव्हते. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.

जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे आडनाव मागे पडून ते फुले बनले.

बालपण आणि शिक्षण

ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा  जिल्ह्यातील कटगुण  हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

शैक्षणिक कार्य

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.

सामाजिक कार्य

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थाॅॅॅमस पेन  यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली.

  • संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. 'कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो', असे त्यांचे मत होते. 
  • सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वत:च्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे.
  • आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.
  • आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन करणारा' म्हणावे.
  • आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे.
  • स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
  • स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
  • महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म', आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे. ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

sports and health

भारत चीन युद्ध (1962)

Discovering Bali: The Island of Gods